घरपंढरपूरSveri Collage Pandharpur : स्वेरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी...

Sveri Collage Pandharpur : स्वेरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी

Sveri Collage Pandharpur :

पंढरपूर– ‘अनिष्ठ रूढी, परंपरा, समाजव्यवस्था हे सर्व बदलण्यापूर्वी सर्वप्रथम आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. ज्या विचारांचा पाया महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घातला, त्या विचारांचे आपण अनुकरण करणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्य आणि कार्य हा एक असा विषय आहे की, ज्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय आपल्याला त्यांच्या कार्याची महती लक्षात येत नाही. अमेरिका, जपान हे देश आज प्रगतीच्या बाबतीत पुढे आहेत याचे कारण म्हणजे तेथील शिक्षण व्यवस्था भक्कम आहे. भारतीय समाजव्यवस्थेत विषमता असल्याने मुठभर परकीयांनी देशावर वर्चस्व गाजवले. यातून भारताची अधोगती झाल्याचे दिसून येते. म्हणून जर देशासाठी काहीतरी करायचे असेल तर सर्व प्रथम मनातून ज्ञानाची व राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवावी लागते. त्यामुळे विधायक बदल घडविण्यासाठी स्वप्ने महत्वाची असतात.’ असे प्रतिपादन मुंबईमधील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथील प्रा. डॉ.भास्कर थोरात यांनी केले.
स्वेरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आय.सी.टी., मुंबई येथील प्रा. डॉ.भास्कर थोरात हे मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्वेरी गीत व भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनानंतर स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून ‘माणसाकडे प्रचंड इच्छाशक्ती असेल आणि सोबत कष्ट करण्याची तयारी असेल तर तो चमत्कार घडवू शकतो. डॉ.आंबेडकर यांनी विद्यार्थीदशेपासून ते पीएच.डी. शिक्षणापर्यंत व त्यानंतर देखील समाजाच्या प्रगतीसाठी प्रचंड अवघड असे कार्य केले. या मार्गावर त्यांनी अनेक हाल-अपेष्टा, वेदना सहन केल्या. ‘माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे’ या थोर विचारांच्या भक्कम पायावर पुढे डॉ. आंबेडकरांनी समाजाची परिस्थिती बदलण्यासाठी कार्य केले. ‘शिका, संघर्ष करा आणि संघटीत व्हा’ हे ब्रीद घेऊन त्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. एकूणच तत्कालीन समाजाची मानसिकता बदलण्याचे कार्य डॉ. आंबेडकर यांनी केले.’ असे सांगून त्यांचे कार्य व कर्तुत्वावर प्रकाश टाकला. पुढे बोलताना प्र.पाहुणे डॉ.थोरात म्हणाले की, ‘स्वेरीचा पाया उच्च विचारांवर उभा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पूर्णपणे शिक्षित करून त्यांचे जीवन फुलविण्याचे कार्य डॉ. रोंगे सर करत आहेत, हे दिसून येते. म्हणून सध्या भारताला डॉ.रोंगे सरांसारख्या शिक्षकांची गरज आहे. ज्या युवकांकडे स्वप्ने नाहीत त्यांचे जीवन व्यर्थ आहे. राष्ट्रहितासाठी सर्वांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे कारण प्रत्येक माणसात एक राजहंस दडलेला असतो पण ते आपल्यालाच ओळखावे लागते. शिक्षकांपेक्षा विद्यार्थी हुशार असला तर त्याचा शिक्षकाला अभिमान वाटला पाहिजे. प्रगती करायची असेल तर प्रथम माणसातील शिक्षकांना शोधा, त्यांना अभ्यासाच्या पुर्ततेसाठी प्रश्नांचा भडीमार करून त्रास द्या, त्रास देऊनही जे शिक्षक तग धरून राहतील तेच खरे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे नंदनवन करतील. डॉ.आंबेडकरांनी त्यांचे शिक्षक शोधले. त्यामुळे ते विद्वान झाले. डॉ.आंबेडकरांच्या विचारांची पद्धत ही समाजाच्या समजण्याच्या पलीकडे होती. जोपर्यंत समाजातील मानसिकता बदलत नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही. म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर नको, डोक्यात घ्या.’ असे सांगून भाक्रा-नांगल प्रकल्प, नदी जोड कालवा, जलप्रकल्प यावर त्यांनी सविस्तर सांगितले. अध्यक्षीय भाषणात स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिले आहे. यावर डॉ.थोरात सरांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनाकडे कसे पहावे? हे उत्तम पद्धतीने सांगितले.’ असे सांगून त्यांनी १३ व्या शतकातील संत नामदेव, संत ज्ञानेश्वर व संत जनाबाई यांच्या कार्यावर प्रकाश टाकून पंढरपूर व डॉ. आंबेडकर यांचे ‘मूकनायक’ वृत्तपत्र याबाबत सविस्तर माहिती सांगितली. यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या गुणवत्ता यादीत स्वेरीच्या अभियांत्रिकी व फार्मसीमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक, प्रोजेक्ट आणि विभागात यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच पीएच.डी. प्राप्त केलेल्या प्राध्यापकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘स्वेरीयन’ च्या त्रैमासिक अंकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले. यावेळी सौ.पद्मा थोरात, भानुदास वाघमारे, सौ. जमुना वाघमारे, पालक, स्वेरीचे विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, विद्यार्थिनी प्रतिनिधी पूजा बत्तुल, यांच्यासह स्वेरी संचलित अभियांत्रिकी व फार्मसीचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व चारही महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे प्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा