Vijay Shivtare News :
शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. पुरंदरमध्ये कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत शिवतारे लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. शिवतारेंचं बंड थंड झाल्यामुळे महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अडचणी कमी झाल्या आहेत. तर लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण तह केला असून पुरंदरच्या (Purandar) इतिहासातला हा दुसरा तह असल्याचं स्पष्टीकरण शिवतारे यांनी आपलं बंड मागे घेताना दिलं आहे.
मात्र खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत वारंवार चर्चा करुनही आपल्या मतावर ठाम असणाऱ्या शिवतारेंनी माघार घेतलीच कशी? असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर खुद्द विजय शिवतारे यांनीच आजच्या पत्रकार पत्रकार परिषदेत दिलं आहे.
खतगावकर यांनी मला फोनवर सांगितलं की, “आपल्या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होत आहे. महायुतीचं वातावरण बिघडून राज्यात महायुतीचे 15-20 खासदार पडू शकतात. मतांचं विभाजन होऊन महाविकास आघाडीचा फायदा होईल. अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय शिवतारे ऐकत नाही म्हणून वरिष्ठ नेत्यांकडून काही गैरसमज झाले, तर ते चालणार नाही” असं खतगावकरांनी सांगितल्याचं शिवतारे म्हणाले.
हे ऐकल्यानंतर आपल्यामुळे मुख्यमंत्र्यांची आणि महायुतीची अडचण होत आहे. आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि मोदींना (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी सत्ता भाजपकडे देण्याचा प्रयत्न असताना माझ्याकडून असं काही घडलं तर ते इतिहासात लिहिलं जाईल. त्यामुळे खतगावकरांच्या त्या फोननंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या समवेत रात्री 2 तास चर्चा झाली. त्यामध्ये माझं म्हणणं ऐकून घेण्यात आलं. यावेळी मी माझ्या काही मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद आल्याने मी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला,” असं शिवतारे यांनी सांगितलं.